श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे संत सेवा महानुभाव समितीची स्थापना

श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे संत सेवा महानुभाव समितीची स्थापना
पारध (श्री महेंद्र बेराड सर भोकरदन तालुका प्रतिनिधी) :
भोकरदन तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे संत, महंत व आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवा महानुभाव समितीची स्थापना करण्यात आली. धर्म, संस्कृतीचे संरक्षण व सामाजिक एकजूट निर्माण करण्यासाठी ही संघटना कार्यरत राहील, असे मत विविध आश्रमांच्या महंतांनी यावेळी व्यक्त केले.
या आध्यात्मिक व समाजहितकारी कार्याचा भव्य शुभारंभ बुधवार दि. ४ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, प. पू. म. भीष्माचार्य बाबाजी, हभप शिवगिरी महाराज (धारेश्वर संस्थान, घाटनांद्रा), हभप बजरंग गिरी महाराज (आण्वा) तसेच पत्रकार रवी लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हभप ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर म्हणाले की, आजच्या बदलत्या काळात धर्माची दीपशिखा प्रज्वलित ठेवणे, संस्कारांची गंगा अखंड वाहती ठेवणे, युवक-युवतींना योग्य दिशा देणे आणि संतपरंपरेचा गौरव जपणे हा या समितीचा सामूहिक संकल्प आहे. हा सोहळा केवळ एका संस्थेचा प्रारंभ नसून तो आध्यात्मिक जागरणाचा आणि एकात्मतेच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ आहे.
या सोहळ्यास विविध राजकीय, धार्मिक, पत्रकार तसेच शासकीय अधिकारी, श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील सर्व आश्रमस्थ महंत, पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक विचारवंतांनी समितीच्या स्थापनेबद्दल आपले विचार व्यक्त केले.
दरम्यान, समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली –
अध्यक्ष : प. पू. म. श्री. सचिन दादा मेहकरकर
उपाध्यक्ष : प. पू. म. श्री. गोमेराज बाबा पुजदेकर
सचिव : प. पू. म. श्री. बाम्बास बाबा
सहसचिव : प. पू. म. श्री. पांगरीकर बाबा
कोषाध्यक्ष : प. पू. म. श्री. योगीराज दादा विराट
यावेळी प. पु. म. श्री. आलेगावकर बाबाजी, प. पु. म. श्री. मुकुंदराज दादा कल्याणकर, प. पु. म. श्री. अच्युतराज शास्त्री आंबेकर, प. पु. म. श्री. अमृतराज शास्त्री मेहकरकर, श्याम शास्त्री विराट आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.