सांगली न्यायालयाच्या वाहनतळावर भीषण आग; दोन दुचाकी जळून खाक

सांगली न्यायालयाच्या वाहनतळावर भीषण आग; दोन दुचाकी जळून खाक
सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्हा न्यायालय परिसरात मंगळवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. न्यायालयाच्या तळमजल्यावरील वाहनतळावर उभी असलेली एक इलेक्ट्रिक दुचाकी अचानक पेटल्याने मोठा गोंधळ उडाला. या आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीलाही बसली आणि तीही आगीत भस्मसात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास वाहनतळात उभी असलेली इलेक्ट्रिक दुचाकी अचानक पेट घेतली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. परिसरात उपस्थित नागरिक आणि न्यायालयीन कामासाठी आलेल्या पक्षकारांमध्ये एकच धावपळ उडाली.
दरम्यान, घटनास्थळी असलेल्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत धाडसाने पेटती दुचाकी बाजूला ओढली. त्यानंतर न्यायालयातील अग्निशमन उपकरणांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून इतर काही वाहनांना किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार, संबंधित इलेक्ट्रिक दुचाकीच्या वायरिंगमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे न्यायालय परिसरातील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.



