नंदुरबार -शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला;
नंदुरबार -शहादा पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने वाद चिघळला;
शहादा, दि. २८ : नंदुरबार शहादा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारण्याच्या प्रशासकीय भूमिकेवरून वाद निर्माण झाला असून, उपनगराध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहर विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो होतो आणि जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले असल्याचे सांगत त्यांनी पालिकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असावा, अशी भूमिका मांडली. “पालिकेच्या सभांमध्ये घडणाऱ्या प्रत्येक बाबीची माहिती पत्रकारांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, पहिल्या दोन सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रशासन नेमके काय लपवत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात उपनगराध्यक्षा म्हणून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत पत्रकारांना सभेत प्रवेश देण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर नगराध्यक्षांकडून सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वाद अधिकच चिघळला असल्याचे त्यांनी नमूद केले.
“पालिकेचा कारभार हा जनतेचा असून त्यात पारदर्शकता असणे अत्यावश्यक आहे. नातेसंबंध किंवा ‘अनुभवी-बिगर अनुभवी’ असा भेदभाव करण्याचा आमचा हेतू नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली.
शहरातील नागरिकांनी २९ पैकी २० नगरसेवक आणि २ स्वीकृत सदस्यांना निवडून दिल्याचा उल्लेख करत, “या २२ सदस्यांच्या पाठबळावर आम्ही जनतेचा विश्वास कायम ठेवू आणि पालिकेच्या कारभारात पूर्ण पारदर्शकता आणू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणामुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार विजय रणभोर.

