मिरजेत ‘गुप्तधना’च्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक; भोंदूबाबा रघुनाथ साळुंखे पोलिसांच्या जाळ्यात
मिरजेत ‘गुप्तधना’च्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक; भोंदूबाबा रघुनाथ साळुंखे पोलिसांच्या जाळ्यात
मिरज | १८ मार्च २०२६ : घरातील इडा-पिडा टाळण्याचे आणि जमिनीत गाडलेले ‘गुप्तधन’ काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला मिरज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.रघुनाथ साळुंखे (वय ४८,रा.मिरज परिसर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार महिलेच्या घरात गेल्या काही दिवसांपासून सतत आजारपण आणि आर्थिक अडचणी सुरू होत्या.याचाच फायदा घेऊन आरोपी रघुनाथ साळुंखे याने महिलेचा विश्वास संपादन केला.”तुमच्या घराच्या कोपऱ्यात पूर्वजांचे गुप्तधन गाडलेले आहे,परंतु त्यावर मोठी बाधा आहे.जर विशेष पूजा आणि विधी केला,तर हे धन तुम्हाला मिळेल आणि घरातील सर्व संकटे दूर होतील,”असे खोटे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले.हे गुप्तधन काढण्यासाठी साळुंखे याने वेळोवेळी ‘पूजेचे साहित्य’, ‘अघोरी विधी’ आणि ‘बळी’ देण्याच्या नावाखाली महिलेकडून एकूण ३ लाख ५० हजार रुपये उकळले.पैसे देऊनही काहीच हाती लागत नसल्याने आणि आरोपी अधिक पैशांची मागणी करू लागल्याने महिलेला संशय आला.तिने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि अखेर मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (DB) पथकाने सापळा रचला.ठरल्याप्रमाणे पैसे घेण्यासाठी आलेल्या रघुनाथ साळुंखे याला पोलिसांनी रंगेहात पकडले.त्याच्याकडून पूजेचे काही साहित्य आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय,अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून,त्याने अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का,याचा तपास पोलीस करत आहेत.
“कोणीही मंत्र-तंत्र किंवा गुप्तधनाचे आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका.अशा भोंदूगिरीची माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे,”असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी केले आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.



