*मिरा-भाईंदरकरांसाठी मोठी बातमी! दहिसर–काशिगाव मेट्रो येत्या आठवड्यात सुरू; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन*
*मिरा-भाईंदरकरांसाठी मोठी बातमी! दहिसर–काशिगाव मेट्रो येत्या आठवड्यात सुरू; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन*
मिरा रोड | प्रतिनिधी ज्ञ
दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ मधील दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा येत्या आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीरपणे दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिरा-भाईंदर शहराला थेट मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्याकडून सुमारे सात वर्षांपूर्वी दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ चे काम हाती घेण्यात आले होते. हा प्रकल्प दहिसर–काशिगाव आणि काशिगाव–नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मागील काही महिन्यांपासून मेट्रोची यशस्वी चाचणी सुरू आहे.
दरम्यान, १ ते ३ जानेवारीदरम्यान सीएमआरएसच्या पथकाने प्रकल्पाची पाहणी करत काही किरकोळ सुधारणा सुचवल्या होत्या. त्या सूचनांची पूर्तता करण्याचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, त्यामुळेच मेट्रोच्या प्रारंभाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली होती.
शुक्रवारी मिरा-भाईंदरमधील विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी महापालिकेच्या रौप्य महोत्सव पदार्पण कार्यक्रमात सांगितले. याच भेटीत मुख्यमंत्री स्वतः मेट्रोच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे मेहता यांनी जाहीर भाषणात सांगितले. त्यामुळे या आठवड्यातच दहिसर ते काशिगाव मेट्रो सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सध्या मिरा-भाईंदर परिसरातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतील प्रचंड गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दहिसर टोलनाक्यावर रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर काशिगाव, पांडुरंगवाडी, मिरा गाव आदी स्थानकांवरून थेट अंधेरीपर्यंत जलद आणि सुरक्षित प्रवास शक्य होणार असल्याने मिरा-भाईंदरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब


