महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; नाशिक भोंदूबाबा प्रकरणामुळे राजकारणात खळबळ
पुणे, २१ मार्च २०२६ :
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (भोंदूबाबा) प्रकरणाशी नाव जोडले गेल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार त्यांनी १९ मार्च रोजी राजीनामा सादर केला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक गुन्हे शाखेने १७ मार्च रोजी अशोक खरात याला लैंगिक अत्याचार, गुंगीचे औषध देऊन महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्या कार्यालयातून ५८ अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, चाकणकर यांचे खरातसोबतचे काही व्हायरल फोटो, पाय धुण्याचा व्हिडिओ आणि ‘शिवनिका ट्रस्ट’मार्फत असलेले संबंध समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडेही राजीनामा सादर केल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, विपक्षातील नेत्या सुषमा अंधारे यांनी आयोगाच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चाकणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा निर्णय या प्रकरणाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
या घटनेमुळे महिला आयोगाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, नवीन अध्यक्षा कोण होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विपक्षाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून, उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या फसवणुकीची आणखी प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी विजय रणभोर
