जतमध्ये महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या २८ ‘पुरुष सुधारकांचा’ गौरव! ‘माविम’चा जतमध्ये दणदणीत कार्यक्रम

जतमध्ये महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या २८ ‘पुरुष सुधारकांचा’ गौरव! ‘माविम’चा जतमध्ये दणदणीत कार्यक्रम
जत (प्रतिनिधी): महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,यासाठी त्यांना मोलाची साथ देणाऱ्या पुरुषांचा सन्मान करण्याचा अनोखा सोहळा जतमध्ये पार पडला.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),सांगली अंतर्गत असलेल्या ‘क्रांती लोकसंचलित साधन जत केंद्राच्या (CMRC) वतीने’ नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत’ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या २८ मान्यवरांना ‘पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार २०२५-२६’ देऊन गौरवण्यात आले.येथील क्रांती लोकसंचलित साधन केंद्र जत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राच्या अध्यक्षा वर्षा गुरखी होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्रीखंडे सर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या निकम मॅडम,नगरसेवक इम्रान गवंडी आणि साधन केंद्राचे व्यवस्थापक पिराजी तांबे उपस्थित होते.
महिला बचत गटांना बळकटी देण्यासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस झटणारे वळसंग गावचे युवा नेते श्री. केंचराव भैरू वगरे, दैनिक पुढारीचे पत्रकार श्री.मारुती लक्ष्मण कोळी आणि मुचंडी गावचे युवा नेते श्री.सुरेश गंगाण्णा देवर्षी यांच्यासह एकूण २८ जणांना ‘पुरुष सुधारक’ या विशेष किताबाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीखंडे सर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. “शेतकऱ्यांनी आता आधुनिक व्हावे आणि मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या शेतीमालाचे बाजारभाव तपासावेत,” असे आवाहन त्यांनी केले तसेच निकम मॅडम यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक पिराजी तांबे यांनी केले.या सोहळ्याला तालुक्यातील विविध गावांतील महिला,पुरुष आणि लोकसंचलित साधन केंद्राचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सोहळा महिला आणि पुरुषांच्या एकत्रित प्रयत्नातून समाज परिवर्तनाची नवी दिशा देणारा ठरला.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.
