Maharashtra

जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी २ एप्रिलला मतदान;

जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी २ एप्रिलला मतदान;

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेमधील विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येत्या २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या निवडीसाठी एकूण सदस्यांपैकी किमान एक तृतीयांश सदस्यांची उपस्थिती (कोरम) आवश्यक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समित्यांच्या सभापती पदांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जाणार असून, त्यानंतर मतदान प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा परिषद स्थापनेनंतर ठराविक कालावधीत विषय समित्यांची स्थापना करणे बंधनकारक असल्यामुळे प्रशासनाने ही प्रक्रिया गतीने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्ष आणि गटांकडून सभापती पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. संभाव्य राजकीय समीकरणे आणि गटबाजीमुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button