घाटंजी-माणोली रोडवर भीषण अपघात; आकपुरी येथील दोन तरुणांचा मृत्यू
घाटंजी-माणोली रोडवर भीषण अपघात; आकपुरी येथील दोन तरुणांचा मृत्यू
घाटंजी, ता. २० : घाटंजी-माणोली मार्गावर मंगळवारी (१७ मार्च) रात्री सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात आकपुरी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गजानन आडे (वय २६) व प्रज्वल कचाडे (वय २९) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण पल्सर दुचाकीने घाटंजीकडून माणोलीकडे जात होते. माणोली गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. उत्कर्ष फाउंडेशनची रुग्णवाहिका आणि मुज्जू पटेल यांना कळविण्यात आले. मुज्जू पटेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत स्वतः रुग्णवाहिका चालवत जखमींना तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते, परंतु आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, आमदार राजू तोडसाम यांनी या घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या व परिस्थितीचा सतत आढावा घेतला.
या दुर्दैवी घटनेमुळे आकपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
— प्रतिनिधी विजय रणभोर