Maharashtra

गंगापूरमध्ये स्टॅम्प विक्रेत्यावर लाचलुचपतचा सापळा; 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले..

गंगापूरमध्ये स्टॅम्प विक्रेत्यावर लाचलुचपतचा सापळा; 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले..

गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) – शासकीय कामासाठी स्टॅम्प पेपर देताना अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या शासनमान्य स्टॅम्प विक्रेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी श्रीकांत मोहनराव बनसोड (वय 70), राहणार वर्धमान रेसिडेन्सी, गंगापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार पोलीस निरीक्षक शरदचंद्र सुरेशराव रोडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी शैक्षणिक कामासाठी 500 रुपयांचे 10 स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी बनसोड यांच्या दुकानात भेट दिली असता, 5000 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 5500 रुपये मागण्यात आले. यामध्ये 500 रुपये ही लाच असल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारदारांनी लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता आरोपीने अतिरिक्त रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीने तक्रारदाराकडून 5500 रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. जप्त रकमेपैकी 5000 रुपये स्टॅम्पची किंमत असून 500 रुपये लाच म्हणून स्वीकारले असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळू जाधवर यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button