गॅस टंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील उद्योग अडचणीत; उत्पादन ठप्प होण्याची भीती.
प्रतिनिधी, पुणे
पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठा संकटाचा फटका आता पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला बसू लागला आहे. औद्योगिक एलपीजीसह विविध गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मोठ्या अडचणीत सापडले असून अनेक ठिकाणी उत्पादन थांबविण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे ७५०० उद्योगांवर या संकटाचा परिणाम झाला आहे. अनेक उद्योगांकडे केवळ काही दिवसांचा गॅस साठा उरला असून, उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. काही उद्योग अंशतः सुरू ठेवण्यात आले आहेत, तर काहींनी पर्याय म्हणून यंत्रसामग्री विजेवर चालविण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, त्यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मनोदीप इंडस्ट्रीजचे राहुल भुजबळ यांनी सांगितले की, “गॅसअभावी काही युनिट्स इलेक्ट्रिकवर शिफ्ट केली आहेत. मात्र, यासाठी चार ते पाच लाखांचा अतिरिक्त खर्च करावा लागला असून, रनिंग कॉस्टही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.”
औषधनिर्मिती, फॅब्रिकेशन, ऑटो पार्ट्स, पावडर कोटिंग, गॅल्व्हनायझिंग आणि काचनिर्मिती यांसारख्या उद्योगांचे उत्पादन घटले असून काही ठिकाणी ते पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे. भोसरी एमआयडीसीतील रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे कल्याण ढोकळे यांनी सांगितले की, “गेल्या १५ ते २० दिवसांपासून गॅस मिळालेला नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकवर शिफ्ट करून एकाच शिफ्टमध्ये मर्यादित उत्पादन सुरू ठेवावे लागत आहे.”
चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुमारे २० हजार लघुउद्योग गंभीर संकटात सापडले असून, पूरक उद्योगांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, या गॅस टंचाईचा परिणाम धार्मिक संस्थांवरही दिसून येत आहे. जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थानच्या अन्नदान सेवेलाही याचा फटका बसला असून, भाविकांना प्रसाद वाटप करताना अडचणी निर्माण होत आहेत. अन्नसेवा कक्षासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने राज्यांना २० टक्के जादा व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आदेश दिला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप स्पष्ट नाही. उद्योगांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.”
या संकटाचा परिणाम केवळ उत्पादन क्षेत्रापुरता मर्यादित नसून, कारखान्यांतील कँटीन सेवा, रुग्णालये आणि आयटी कंपन्यांना अन्नपुरवठा करणाऱ्या युनिट्सनाही मोठा फटका बसत आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून होत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे