दिव्यांग व महिलांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारणार- सभापती राणी माई पठारे
दिव्यांग व महिलांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारणार- सभापती राणी माई पठारे
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि. १६ मार्च २०२६ :–महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील बसस्थानके, बाजारपेठा, मंडई, मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला आणि दिव्यांगांसाठी सर्व सुविधायुक्त आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई पठारे यांनी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे महिला दिन आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार अश्विनीताई जगताप, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, माजी नगरसेविका श्रद्धा ताई रवि लांडगे, प्रियाताई अण्णा बनसोडे, उपायुक्त ममता शिंदे सहीत सर्व महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना राणीमाई पठारे म्हणाल्या की,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असून राज्यातील नामांकित महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नावलौकिक मिळविल्याचा अभिमान वाटतो.शहरातील बसस्थानके, बाजारपेठा, मंडई, मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला आणि दिव्यांगांसाठी सर्व सुविधायुक्त आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. शहरातील महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे होणारी गैरसोय आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महिलांसाठी स्वतंत्र आधुनिक स्वच्छतागृहे उभारणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका ठरेल.
शिक्षण, नोकरी किंवा प्रशिक्षणासाठी शहरात बाहेरून येणाऱ्या महिलांसाठी अल्पदरात ‘वन स्टॉप शेल्टर होम’ म्हणजेच सुरक्षित वस्तीगृह उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या महिलांना सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे. संकटात सापडलेल्या कोणत्याही महिलेला या ॲपच्या माध्यमातून पोलीस, महानगरपालिका तसेच सामाजिक संस्थांशी थेट संपर्क साधून मदत मागता येणार आहे. या ॲपला पोलीस व पालिका यंत्रणेची जोड देण्यात येणार असून यासाठी महिला सुरक्षा व सहाय्यता समिती स्थापन करण्यात येणार आहे.तसेच शहरातील महिलांनी महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुचविल्यास त्यांचेही स्वागत करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे मत सभापती राणीमाई पठारे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्या महिला बचत गटाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत अशा जवळपास ५० गटांचा सत्कार करण्यात आला.महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाराशे पेक्षा जास्त महिलांनी याचा मनमुराद आनंद लुटला.
प्रतिनिधी विजय अडसूळ