भोंदूबाबा प्रकरण: रुपाली चाकणकर यांना राजीनाम्याचे निर्देश
भोंदूबाबा प्रकरण: रुपाली चाकणकर यांना राजीनाम्याचे निर्देश
मुंबई, २० मार्च :
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
१९ मार्च रोजी मुंबईतील वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, २० मार्चपर्यंत चाकणकर यांचा राजीनामा सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरात यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण तसेच जमीन घोटाळ्यांसारखे गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे त्यांच्यासोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद अधिकच वाढला आहे. या घटनेमुळे त्यांच्या भूमिकेबाबत नैतिक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांसह विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, चौकशी निष्पक्षपणे पार पडावी यासाठी राजीनामा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात असून, राजीनाम्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


