बेलंकी परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दर विद्यार्थिनीवर भरारी पथकाची कारवाई; मिरज तालुक्यात खळबळ
बेलंकी परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दर विद्यार्थिनीवर भरारी पथकाची कारवाई; मिरज तालुक्यात खळबळ
सांगली (प्रतिनिधी) : मिरज तालुक्यातील बेलंकी येथील परीक्षा केंद्रावर दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर भरारी पथकाने प्रत्यक्ष कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,बेलंकी येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागाच्या विशेष भरारी पथकाने अचानक भेट दिली.वर्गाची तपासणी करत असताना एका विद्यार्थिनीकडे कॉपीचे साहित्य आढळून आले.पथकाने तातडीने संबंधित साहित्यासह विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन तिचे उत्तरपत्रिकेसह सर्व पुरावे जप्त केले आहेत.कॉपी करताना पकडण्यात आलेल्या या विद्यार्थिनीवर बोर्डाच्या नियमानुसार ‘गैरप्रकार’ (Malpractice) दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अहवाल आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (पुणे बोर्ड) पाठवण्यात येणार असून,नियमानुसार संबंधित विषयाची परीक्षा रद्द होण्यापासून ते पुढील काही वर्षांसाठी परीक्षेस बसण्यास बंदी घालण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.
जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, अशा घटना घडत असल्याने भरारी पथकांनी आपली तपासणी अधिक कडक केली आहे.”विद्यार्थ्यांनी कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, अन्यथा त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते,”असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी. जत/सांगली.

