पारध येथील बालाजी चैत्र नवरात्र महोत्सवात महादेव स्वारी व लोकनाट्याने रंगली भक्ती-मनोरंजनाची सांगड

पारध येथील बालाजी चैत्र नवरात्र महोत्सवात महादेव स्वारी व लोकनाट्याने रंगली भक्ती-मनोरंजनाची सांगडa
पारध : श्री बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने साजऱ्या होत असलेल्या चैत्र नवरात्र महोत्सवात यावर्षीही महादेव, पार्वती व देवी अंबाबाई यांच्या पारंपरिक स्वाऱ्यांनी गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. महादेव व पार्वती यांची नंदीवरील स्वारी तसेच देवीची स्वारी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून तसेच जालना, संभाजीनगर, बुलढाणा, मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने पारधमध्ये दाखल झाले आहेत. सासरी गेलेल्या लेकीबाळीही या निमित्ताने माहेरी येत असल्याने गावात आपुलकीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावर्षी महादेवाची स्वारी अमोल देशमुख (भुसारे) यांनी, पार्वतीची स्वारी रोहन लोखंडे यांनी तर देवीची स्वारी विशाल बेराड यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी देवीची स्वारी सामान्य असली तरी पारध येथील महादेवाची स्वारी ही दुर्मिळ परंपरा असल्याने या उत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वारी सजवण्याचा व घरातून काढण्याचा मान परंपरेने कुलकर्णी घराण्याकडे असून त्यांनी ही परंपरा जपली आहे.
उत्सवानिमित्त दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून खास लोकांच्या आग्रहास्तव “बाई तुझ्या पायी अर्थात विहीर गेली चोरीला” या तुफान विनोदी लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात अभिनय सम्राट रवींद्र लोखंडे सर, प्रा. शरद काकडे, रमेश सुरडकर, नृत्यांगना श्रुती नगरकर, साधना विटोरे यांच्यासह पांडू लोखंडे, धनंजय देशमुख, कडूबा पांडे या कलाकारांनी उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.
सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणले आहे की,
“पारध येथील श्री बालाजी चैत्र नवरात्र महोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि एकोप्याचा जिवंत वारसा आहे. विशेषतः महादेवाची नंदीवरील स्वारी ही अत्यंत दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असून ती जपली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने गावातील तसेच बाहेरगावी असलेले नागरिक एकत्र येतात, लेकीबाळी माहेरी येतात आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात.
तसेच धार्मिक कार्यक्रमांसोबतच लोकनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावकऱ्यांना दर्जेदार मनोरंजन मिळते आणि ग्रामीण कला जिवंत राहते. अशा प्रकारचे उत्सव समाजाला एकत्र ठेवण्याचे आणि नव्या पिढीला संस्कार देण्याचे मोठे कार्य करत आहेत.”

