Maharashtra

नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात तलाठी चंद्रकांत खिल्लारे अटकेत; चार दिवसांची पोलीस कोठडी

जालना, दि. ४ (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तलाठी चंद्रकांत तुकाराम खिल्लारे यांना आर्थिक गुन्हे शाखा, जालना यांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अंबड व घनसावंगी तालुक्यातील काही अधिकाऱ्यांनी बनावट (शेती नावावर नसलेली) नावे याद्यांमध्ये समाविष्ट करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार सुमारे २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखा, जालना करीत आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी ३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी तलाठी चंद्रकांत खिल्लारे हे गुन्हा घडल्यानंतर फरार होते. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी अंबड परिसरातून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ७ मार्च २०२६ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

प्रतिनिधी महेंद्र बेराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button