वळसंगमध्ये विकासाचा ‘डिजिटल’ धुराळा; निवडणुकांमध्ये स्वप्नं आणि जयंतीला फक्त स्वच्छतेचा देखावा!
वळसंग (विशेष प्रतिनिधी) वळसंगमध्ये विकासाचा ‘डिजिटल’ धुराळा; निवडणुकांमध्ये स्वप्नं आणि जयंतीला फक्त स्वच्छतेचा देखावा!
“निवडणुकीच्या वेळी विकासाची मोठी स्वप्नं दाखवायची आणि थोर पुरुषांच्या जयंती आली की केवळ फोटोसेशनसाठी स्वच्छतेचा देखावा करायचा,हीच सध्या वळसंग ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यपद्धती बनली आहे,”अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.प्रत्यक्ष जमिनीवर विकास शोधून सापडत नसताना, केवळ ‘यूट्यूब’ आणि सोशल मीडियावर मिरवणाऱ्या प्रशासकीय कारभारावर आता सामान्य नागरिक उघडपणे तोफ डागत आहेत.नेमका प्रकार काय?
नुकतीच संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.
या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाने गावात स्वच्छता मोहीम राबवल्याचा दावा करत एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध केला.
मात्र,या व्हिडिओवर एका जागरूक नागरिकाने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.”आजकाल सर्वत्र विकासाच्या बातम्या आणि घोषणा ऐकायला मिळतात, पण प्रत्यक्षात तो विकास कुठे झाला हे मात्र सामान्य माणसाला दिसत नाही,” असे स्पष्ट मत या नागरिकाने मांडले आहे.
डिजिटल चमकोगिरी आणि वास्तव वळसंगच्या गल्लोगल्लीत आजही धुळीचे साम्राज्य,साचलेली गटारे आणि प्रलंबित नागरी सुविधांचे प्रश्न आ वासून उभे आहेत.
मात्र, प्रशासनाकडून केवळ जयंती किंवा विशेष दिवसांच्या निमित्ताने झाडू हातात धरून फोटो काढण्यापलीकडे ठोस काम होताना दिसत नाही.”यूट्यूबवर वळसंग ‘स्मार्ट’ दिसते, पण प्रत्यक्षात नागरिकांना धुळीचा सामना करावा लागतोय,” अशी टीका आता जोर धरू लागली आहे.
लोकभावना निवडणुकीच्या काळात गावाचा कायापालट करण्याचे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता फक्त कॅमेऱ्यासमोरच सक्रिय का?असा सवाल सामान्य माणूस विचारत आहे.
संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला, पण त्यांच्या जयंतीच्या दिवशी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ‘स्वच्छतेचा इव्हेंट’ हा बाबांच्या विचारांची थट्टा असल्याचे मत काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाला इशारा केवळ बातम्यांमधून विकास न दाखवता, प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्डे, पिण्याचे पाणी आणि नियमित स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात जनता या ‘दिखाऊ’ विकासाला योग्य उत्तर देईल,असा सूर वळसंगमध्ये उमटत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली