टिपू सुलतान चौक नावबदलावर भाजपाची यू-टर्न भूमिका; मीरा-भाईंदरच्या पहिल्याच महासभेत राजकारण तापले*
*टिपू सुलतान चौक नावबदलावर भाजपाची यू-टर्न भूमिका; मीरा-भाईंदरच्या पहिल्याच महासभेत राजकारण तापले*
मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर शहरात टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, भारतीय जनता पक्षने महापालिकेच्या पहिल्याच महासभेत मीरारोड येथील टिपू सुलतान नाव असलेल्या चौकाचे नामकरण रद्द करण्याचा प्रस्ताव आणून खळबळ उडवली आहे. विशेष बाब म्हणजे, हाच चौक २०१६ साली भाजपाच्याच पुढाकारातून टिपू सुलतान यांच्या नावाने नामांकित करण्यात आला होता.
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्याच्या प्रकरणावरून तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हा विषय अधिकच चिघळला. या पार्श्वभूमीवरच मिरा-भाईंदरमध्येही हा वाद केंद्रस्थानी आला आहे.
महापालिकेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजपाने १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या महासभेत मिरारोड येथील टिपू सुलतान चौकाचे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राजकारणासोबतच समाजकारणातही तीव्र चर्चा सुरू झाली आहे. कारण, आज ज्याला भाजप विरोध करत आहे, तेच नाव भाजपानेच दिले होते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या महासभेत ठराव क्रमांक ९७ अन्वये मिरारोडच्या नया नगर–लोधा कॉम्प्लेक्स मार्गावरील चौकाला ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक व आमदार नरेंद्र मेहता यांनी मांडला होता. या प्रस्तावाला भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुषाली यांनी अनुमोदन दिले होते, तर तत्कालीन महापौर गीता जैन यांनी तो ठराव सर्वानुमते मंजूर केला होता.
महत्त्वाचे म्हणजे, २३ जून २०२१ रोजीच्या महासभेत शहरातील रस्ते, चौक, सार्वजनिक जागा आणि महापालिकेच्या मालमत्तांना पूर्वी दिलेल्या नावांमध्ये बदल करू नये, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. हा ठराव स्वतः तत्कालीन महापौर डिंपल मेहता यांनी मांडला होता आणि भाजपचे दिनेश जैन यांनी त्याला अनुमोदन दिले होते.
आता त्याच निर्णयाच्या विरुद्ध जाऊन नावबदलाचा प्रस्ताव आणण्यात आल्याने भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या ‘यू-टर्न’मुळे आगामी महासभेत जोरदार वादंग होण्याची दाट शक्यता असून, मिरा-भाईंदरच्या राजकारणात टिपू सुलतान चौकाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब
