Maharashtra

स्थायी समितीवर भाजपाचं निर्विवाद वर्चस्व; सभापतीपदावर ‘मेहता गटाचा’ उमेदवार निश्चित?*

*स्थायी समितीवर भाजपाचं निर्विवाद वर्चस्व; सभापतीपदावर ‘मेहता गटाचा’ उमेदवार निश्चित?*

मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर महापालिकेत ९५ पैकी तब्बल ७८ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्याने सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपाचे १३ सदस्य असल्याने निर्णयप्रक्रियेवर भाजपाची पकड मजबूत झाली आहे.
भाजपाकडून गटनेते हसमुख गेहलोत यांच्यासह पंकज पांडेय, दीपक सावंत, विशाल पाटील, संजय थेराडे, हेतल परमार, गणेश शेट्टी, नवीन सिंह, वंदना भावसार, आनंद मांजरेकर, अनिल विराणी, श्रीप्रकाश उर्फ मुन्ना सिंह आणि मनोज दुबे यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर मिरा-भाईंदर विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर, अनिल सावंत आणि शिंदेसेनेच्या शर्मिला बगाजी यांचा समावेश आहे.
आमदार मेहता यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हसमुख गेहलोत यांना गटनेतेपदासोबतच स्थायी समितीत सदस्यत्व देण्यात आल्याने, सभापतीपदाची माळही त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेतील बहुतांश भाजप सदस्य आमदार मेहता यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. पदवाटपात आमदार मेहता यांचा शब्द निर्णायक मानला जात असून, महापौरपदी त्यांनी त्यांच्या भावाची पत्नी डिंपल यांना पुन्हा संधी दिल्याचेही चर्चेत आहे. अन्य महत्त्वाची पदेही मर्जीतल्यांनाच दिल्याची चर्चा आहे.
पालिकेच्या तिजोरीच्या ‘चाव्या’ असलेले स्थायी समिती सभापतीपदही आमदार मेहता यांच्या पसंतीच्या नगरसेवकाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महापालिका आयुक्तांच्या पत्रानंतर कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी पत्र काढून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या ४ मार्च रोजी महापालिका मुख्यालयात ही निवडणूक होणार आहे.
महिला व बालकल्याण समितीचीही निवडणूक ४ मार्चला
९ नगरसेविकांच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीही ४ मार्च रोजीच निवडणूक होणार आहे. या समितीत भाजपाच्या ७ आणि काँग्रेसच्या २ नगरसेविका आहेत. भाजपाकडून अनिता पाटील, सुरेखा सोनार, जया दत्ता, स्नेहा पांडे, हेमा बेलानी, रुपाली मोदी आणि दीप्ती भट, तर काँग्रेसकडून रुबिना शेख आणि रिझवाना खान यांचा समावेश आहे.
महापौरपदासाठी चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका अनिता पाटील यांना किमान महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. याशिवाय स्नेहा पांडे, दीप्ती भट, सुरेखा सोनार, हेमा बेलानी आणि रुपाली मोदी यांची नावेही सभापती व उपसभापती पदासाठी चर्चेत असल्याने, ४ मार्चच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button