सारथी संसाधन मेळावा — बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी आशेचा किरण

सारथी संसाधन मेळावा — बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी आशेचा किरण
औंध (प्रतिनिधी) : दिनांक 08 फेब्रुवारी 2026 रोजी सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने बौद्धिक दिव्यांग विशेष मुलांसाठी ‘सारथी संसाधन मेळावा’चे आयोजन बालकल्याण संस्था, औंध येथे करण्यात आले. बौद्धिक दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या सामर्थ्य फाउंडेशनच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या संसाधन मेळाव्यामध्ये बालरोगतज्ञ, विशेष शिक्षक, व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक तसेच विविध डॉक्टर्स व थेरपिस्ट यांच्यासह शासकीय योजना, विशेष आधार कार्ड आदींसंदर्भात मार्गदर्शन करणारे 25 पेक्षा अधिक तज्ञ सहभागी झाले होते. मेळाव्यात एकूण 106 बौद्धिक दिव्यांग मुलांनी सहभाग नोंदवला.
एकाच छताखाली सर्व शासकीय सेवा व तज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सहभागी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. ICDS एकात्मिक बाल विकास सेवा, DEIC औंध सिविल हॉस्पिटल, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, सप्तश्री फाउंडेशन, बालकल्याण संस्था आदींचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर बच्चे महामंत्री पिं. चिं. भाजपा, डॉ. अमनप्रीत कौर (बजाज CSR), मा. मनीषा बिरारीस नोडल अधिकारी (CDPO), डॉ. प्रफुल कापसे (MIHM), डॉ. मीनाक्षी, डॉ. संध्या (DEIC) आदी उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. शिवानी पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संस्थेचे व्यवस्थापक सौरभ शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले. सामर्थ्य फाउंडेशन टीम, अंगणवाडी सेविका व सर्व स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे