सांगलीत दिमाखात भरणार ६५ वे राज्य कला प्रदर्शन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १६ ला उद्घाटन

सांगलीत दिमाखात भरणार ६५ वे राज्य कला प्रदर्शन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १६ ला उद्घाटन
प्रतिनिधी : वळसंग.
राज्यातील कला क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे ‘६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ (विद्यार्थी विभाग) यावर्षी सांगलीत आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता सांगलीतील शांतिनिकेतन येथील ‘लोकरंगभूमी’ मैदानावर या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
याप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, सुमारे २० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सांगली शहराला या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे यजमानपद मिळाले आहे.५ हजारांहून अधिक कलाकृतींतून निवड या प्रदर्शनासाठी राज्यातील शासकीय आणि अनुदानित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून एकूण ५,६८० कलाकृती प्राप्त झाल्या होत्या.त्यापैकी निवडक १,२७५ कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
यामध्ये रेखा व रंगकला,शिल्पकला, उपयोजित कला,मुद्राचित्रण आणि दिव्यांग विभागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आविष्कार पाहायला मिळणार आहे.
ज्येष्ठ चित्रकार जी.एस. माजगावकर यांचा गौरव
उद्घाटन सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,कलाविश्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ चित्रकार जी.एस. माजगावकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाची वेळ आणि ठिकाण
हे प्रदर्शन सोमवार १६ फेब्रुवारी ते रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय,शांतिनिकेतन, सांगली येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० अशी असेल.सांगलीकर रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कलाविष्काराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
