नागज फाट्यावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर
जत/कवठेमहांकाळ
नागज फाट्यावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर
जत/सांगली – नागज फाटा येथे शुक्रवारी सकाळी भीषण अपघातात एका ६४ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील नागज फाट्याजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, संपतराव सोपान शिंदे (वय ६४, रा. नागज) आणि प्रभाकर नामदेव पाटील (वय ५५, रा. नागज) हे दोघे दुचाकीवरून नागज फाट्यावरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संपतराव शिंदे रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रभाकर पाटील हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला व हाताला मोठी इजा झाली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचार सुरू आहेत.
वाहनचालक फरार
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला. महामार्गावरील प्रवाशांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील टोल नाके व हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
‘डेथ ट्रॅप’ बनलेला नागज फाटा
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नागज फाट्याजवळ वाहनांचा वेग प्रचंड असतो. येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गतिरोधक, सिग्नल किंवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नागज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी, जत/सांगली


