*मिरारोड शांतीपार्कमध्ये एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; नागरिकांमध्ये भीती, अग्निशमन दलाची धाव
*मिरारोड शांतीपार्कमध्ये एसटीपी प्रकल्पातून गॅस गळती; नागरिकांमध्ये भीती, अग्निशमन दलाची धाव*
मिरा रोड | प्रतिनिधी
मिरारोडच्या शांतीपार्क परिसरात मिरा-भाईंदर महानगरपालिकाच्या मलनिस्सारण (एसटीपी) केंद्रातून अचानक गॅस गळती झाल्याची घटना घडली. तीव्र वास पसरल्याने परिसरात एकच घबराट उडाली असून नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाने प्रकल्पातून निघणाऱ्या वायूवर पाण्याचा मारा सुरू करत नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आसपासच्या रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आले असून एसटीपी प्रकल्पाचे अभियंतेही घटनास्थळी पोहोचून गॅस गळतीचे कारण तपासत आहेत. गॅसच्या तीव्रतेमुळे नागरिक मास्क लावूनच वावरताना दिसत आहेत.
दरम्यान, असह्य वासामुळे काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला तर काहींना उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका हेमा बेलानी यांनी दुजोरा देत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
घटनेमुळे मिरारोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब


