मिरा-भाईंदर, वसई-विरार शहर हादरले; एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या*
*मिरा-भाईंदर, वसई-विरार शहर हादरले; एकाच दिवशी सहा जणांची आत्महत्या*
मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात शुक्रवारी घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण शहर हादरले आहे. मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत अवघ्या एकाच दिवशी सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे. या घटनांमध्ये दहा व पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलींसह तरुण व प्रौढांचा समावेश असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सहापैकी पाच घटना वसई-विरार शहरातील विविध भागांत घडल्या असून एक घटना भाईंदरमधील आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये भूषण सुर्वे (वय ३३), शंभूनाथ दुबे (वय ५०), जोया खान (वय १०), शुभांगी शर्मा (वय ४३), जहीरूननिशा आलम (वय १५) आणि वत्सल (वय २३) यांचा समावेश आहे. सर्व प्रकरणांत मृतदेह पोलिसांनी पंचनामे करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राथमिक चौकशीत आजारपण, कौटुंबिक तणाव आणि नैराश्य ही संभाव्य कारणे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, प्रत्येक घटनेचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येत असून मृतांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय अहवाल व इतर पुरावे संकलित करून कारणांची पुष्टी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मागील काही वर्षांत नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आणि सामाजिक संस्थांकडून समुपदेशन व जनजागृतीचे उपक्रम राबवले जात असले, तरी हे उपक्रम पुरेशा प्रमाणात आणि प्रभावीपणे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये वाढता ताण, स्पर्धा, कौटुंबिक समस्या आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे गंभीर प्रश्न बनत चालले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मानसिक आरोग्याबाबत सजग राहावे, कुटुंबीय व मित्रांशी संवाद वाढवावा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन पोलिस व समाजसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे. कोणालाही मानसिक त्रास होत असल्यास त्वरित समुपदेशन केंद्रे, हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब


