केशवनगर चिंचवडमध्ये धोकादायक चेंबर खड्डा ,दुचाकी अडकली
केशवनगर चिंचवडमध्ये धोकादायक चेंबर ; काल दुचाकी अडकली

.पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १८, केशवनगर चिंचवड येथील चैतन्य मेडीको जवळ तसेच उद्यम सहकारी बँकेसमोर असलेल्या मुख्य चौकातील धोकादायक चेंबर खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा मोठा खड्डा तसाच पडून असून वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
कालच या खड्ड्यात एक दुचाकी अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही येथे अनेक वेळा अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे महामंत्री मधुकर बच्चे यांनी नागरिकांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्य रस्त्याच्या मधोमध एवढा मोठा व धोकादायक खड्डा असूनही संबंधित विभाग दोन महिन्यांपासून दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे