Maharashtra

जिद्द-चिकाटीची कमाल! ग्रामीण मुलीची आयआयटी बॉम्बे संशोधन इंटर्नशिपसाठी निवड

जिद्द-चिकाटीची कमाल! ग्रामीण मुलीची आयआयटी बॉम्बे संशोधन इंटर्नशिपसाठी निवड

वळसंग (प्रतिनिधी) : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही देशपातळीवर यश मिळवू शकतात, हे जत तालुक्यातील वळसंग येथील कु. कृत्तिका अनिल कांबळे हिने सिद्ध करून दाखवले आहे. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (AIML) विभागातील या विद्यार्थिनीची देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथे प्रतिष्ठित संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
कृत्तिकाचे वडील अनिल निंगाप्पा कांबळे हे वळसंग ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेल्या कृत्तिकाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तिने तांत्रिक शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
कृत्तिकाची निवड ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (AI) आणि ‘मशिन लर्निंग’ (ML) या भविष्यातील महत्त्वाच्या विषयांवरील संशोधनासाठी झाली असून, आयआयटी बॉम्बेमधील हा अनुभव तिच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ग्रामीण व वंचित समाजातील मुलीने मिळवलेले हे यश संपूर्ण जत तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वळसंग ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतून कृत्तिका व तिचे वडील अनिल कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी जत/सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button