दिघी-भोसरी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष पाठपुरावा!
दिघी-भोसरी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष पाठपुरावा!
दिघी आणि उपनगरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर, विशेषतः भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा प्रश्न आता अतिशय गंभीर झाला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी तर ही वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली असून, तासनतास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः पिरॅमिड हॉटेल ते मॅक्झिन चौक या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूला अनधिकृतपणे पार्क केलेले मोठे ट्रक्स आणि बसेस, तर दुसऱ्या बाजूला पथविक्रेते यामुळे रस्ता अतिशय छोटा झाला असून ही वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या बनली आहे.
या मोठ्या वाहनांच्या आडोशाने मद्यपींचा वावर आणि इतर अनैतिक कृत्य मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यामुळे मॅक्झिन कॉर्नर ते दत्तनगर या ठिकाणी ‘वॉकिंग’साठी येणाऱ्या आमच्या माता-भगिनींच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.
या जनभावनेची दखल घेत आज विकास डोळस यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. विवेक पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. पाटील साहेबांनी तत्परता दाखवत दिघी-आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण साहेब यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच चव्हाण साहेबांनी संपर्क साधून वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ
