*बोरिवली–अहमदाबाद प्रवासी ट्रेनमध्ये अस्वच्छतेचा कळस; प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ*
*बोरिवली–अहमदाबाद प्रवासी ट्रेनमध्ये अस्वच्छतेचा कळस; प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ*

मिरा रोड | प्रतिनिधी
बोरिवली ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या प्रवासी ट्रेनमध्ये साफसफाईचा पूर्णत: अभाव दिसून येत असून, प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. डब्यांतील आसनांखाली कचरा, खाद्यपदार्थांचे तुकडे, कागद, प्लास्टिक पिशव्या आणि जमिनीवर साचलेली घाण यामुळे ट्रेनची अवस्था दयनीय झाली आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन अनेक स्थानकांवरून धावत असताना देखील कोचची नियमित स्वच्छता केली जात नाही. परिणामी दुर्गंधी पसरून प्रवास अधिक त्रासदायक बनतो. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या अस्वच्छ वातावरणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. संसर्गजन्य आजार पसरण्याची भीतीही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
“तिकीट पूर्ण पैसे देऊन प्रवास करायचा आणि बदल्यात घाणेरडा डबा मिळायचा, ही मोठी अन्यायकारक बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात प्रवासी गाड्यांतील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या संदर्भात पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि देखरेख वाढवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब

