बदलापूरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओवरून संताप; महिला शहराध्यक्षांचा राजीनामा
बदलापूरमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओवरून संताप; महिला शहराध्यक्षांचा राजीनामा
बदलापूर येथे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप महिला शहराध्यक्ष प्रतिभा महेश जाधव यांच्या मुलीने श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ कार चालवताना रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती समोर आली असून तो व्हायरल झाल्यानंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणाच्या निषेधार्थ बजरंग दल तसेच वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार आंदोलन केले. काही स्थानिक संघटनांनी बंदची हाक दिल्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रतिभा महेश जाधव यांनी भाजप महिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पती महेश जाधव यांनीही सार्वजनिक माफी मागत कुटुंबाची धार्मिक श्रद्धा असल्याचे स्पष्ट केले.
सध्या प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
