शेळीपालकांचे मोठे नुकसान; अज्ञात रोगामुळे बकऱ्यांचा मृत्यू – आम आदमी पार्टीची भरपाई व लसीकरणाची मागणी
शेळीपालकांचे मोठे नुकसान; अज्ञात रोगामुळे बकऱ्यांचा मृत्यू – आम आदमी पार्टीची भरपाई व लसीकरणाची मागणी
जालना, दि. 18 फेब्रुवारी 2026 – ग्रामीण भागात अज्ञात रोगामुळे शेळ्या व त्यांच्या पिल्लांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असून शेळीपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालना जिल्हा सचिव बोरशे गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक गावांमध्ये शेळ्या व बकऱ्या अचानक आजारी पडून मृत्यूमुखी पडत आहेत. मात्र पशुवैद्यकीय विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेळीपालन हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून, या रोगामुळे त्यांचे चिरतार्थ धोक्यात आले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, पशुवैद्यकीय दवाखान्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, लाखो रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात; मात्र प्रत्यक्षात पशुपालकांना अपेक्षित सेवा मिळत नाहीत. अनेक वेळा दवाखाने बंद असतात, डॉक्टर गैरहजर असतात, औषधे उपलब्ध नसतात किंवा बाहेरून आणण्यास सांगितले जाते. काही ठिकाणी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. त्यामुळे वैतागलेले पशुपालक दवाखान्यात जाणे टाळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या ग्रामीण भागात अज्ञात रोगाने थैमान घातले असून, मेलेल्या प्राण्यांना टाकून देणे शिवाय पशुपालकांसमोर पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
यावर उपाय म्हणून रोगाची तात्काळ चौकशी करून सर्व प्रभावित शेळीपालकांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच संबंधित विभागाला त्वरित लसीकरण व उपचार मोहीम राबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी भोकरदन, बीडीओ पंचायत समिती भोकरदन तसेच पशुवैद्यकीय अधिकारी भोकरदन यांना देण्यात आल्या आहेत.
पंधरा दिवसांच्या आत कार्यवाहीबाबत माहिती न दिल्यास लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी महजाद इस्लाम खान (जिल्हा उपाध्यक्ष), भगवान पालकर (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), इब्राहिम कुरेशी (शहर सचिव, भोकरदन), फारुख शेख (शहर उपाध्यक्ष), नारायण सोन्नी, संतोषराव बोरसे, संतोषराव साळवे तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी महेंद्र बेराड

