सूरतमध्ये जलटाकीला भगदाड पाणीपुरवठा प्रकल्पातील गैरव्यवहार उघड
सूरतमध्ये जलटाकीला भगदाड पाणीपुरवठा प्रकल्पातील गैरव्यवहार उघड
सूरत प्रतिनिधी | दि. १९ जानेवारी २०२६
सूरत जिल्ह्यातील ताडकेश्वर गावात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पातील जलटाकी चाचणीदरम्यान कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. सुमारे २१ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील १५ मीटर उंच जलटाकीमध्ये पाणी भरण्याची चाचणी सुरू असताना अचानक भगदाड पडले. या घटनेत तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
११ लाख लिटर क्षमतेच्या या जलटाकीत चाचणीदरम्यान ९ लाख लिटर पाणी भरले होते. एवढ्या प्रमाणात पाणी भरताच टाकीच्या भिंतींना तडे जाऊन ती कोसळली. संबंधित जलटाकीचा खर्च सुमारे १ कोटी रुपये असून त्यापैकी ८३ लाख रुपये कंत्राटदारांना देण्यात आले होते. मात्र टाकी चाचणीच पार न करू शकल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंत्राटदार जयंती पटेल, बाबू पटेल, त्यांचे सहकारी, पर्यवेक्षक बाबू माणी पटेल, जिगर प्रजापती, तसेच गुजरात वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्ड (GWSSB) चे अधिकारी अंकित गारसिया व जय चौधरी यांचा समावेश आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५), ३१८(४) आणि १२५(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी SVNIT, सूरत आणि GERI या संस्थांच्या तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून बांधकामाचा दर्जा, वापरलेले साहित्य व तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे.
दरम्यान, GWSSB कडून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सरकारी प्रकल्पांमधील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी पुढे जात असताना आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी