Maharashtra

प्रभाग ३० (ब) मधून मथुराताई सुनिल भोईर यांची विकासाच्या ‘दशसूत्री’चा जाहीरनामा सादर 


प्रभाग ३० (ब) मधून मथुराताई सुनिल भोईर यांची विकासाच्या ‘दशसूत्री’चा जाहीरनामा सादर


दापोडी–फुगेवाडी–कासारवाडी :
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३० (ब) मधून मथुराताई सुनिल भोईर यांनी निवडणूक मैदानात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विकासाची दहा सूत्रे’ असा ठोस आणि लोकाभिमुख जाहीरनामा जाहीर केला आहे.
या दशसूत्रीमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, दिव्यांग कल्याण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, क्रीडा व रोजगाराभिमुख उपक्रमांचा समावेश आहे. सर्व शाळांना मॉडेल स्कूल स्वरूप देऊन सायन्स लॅब, स्किल लॅब, सुसज्ज ग्रंथालय व सायन्स पार्क उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अत्याधुनिक उपकरणांसह मॉडेल दवाखाना आणि नागरिकांसाठी मोफत औषध पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी “Skill on Wheels” हा अभिनव उपक्रम, एकल महिलांसाठी “माझं अस्तित्व” सक्षमीकरण योजना, तसेच दिव्यांग नागरिकांसाठी शैक्षणिक सुविधा व योजनांसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
प्रभाग कचरामुक्त व शून्य कचरा करण्याबरोबरच नियमित स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा, खड्डेमुक्त रस्ते, वस्त्या-वस्त्यांत सौरदीप व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावर भर देण्यात आला आहे. बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याचा मुद्दाही जाहीरनाम्यात समाविष्ट आहे.
स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी सुसज्ज भाजी मंडई उभारणे व भाजीफेरीवाल्यांना संरक्षण देणे, तसेच खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व मल्टीपर्पज ग्राउंड विकसित करून तज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प मथुराताई भोईर यांनी व्यक्त केला आहे.
“ही फक्त आश्वासने नसून प्रभागाच्या विकासासाठीची ठोस दिशा आहे. नागरिकांचा विश्वास घेऊन प्रभाग ३० (ब) हा आदर्श प्रभाग म्हणून उभा करणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाच्या निवडणुकीत ज्ञान, शिक्षण व प्रगतीचे प्रतीक असलेल्या ‘पुस्तक’ चिन्हाला मत देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button