Maharashtra

पिंपरी चिंचवडला ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’; रविवारी भव्य लोकार्पण सोहळा.

प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड : शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सक्षम आणि सुलभ न्यायव्यवस्थेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, पिंपरी चिंचवड शहराला आता स्वतःचे हक्काचे ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’ लाभत आहे. या नव्या न्यायालयामुळे नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि प्रभावी होणार आहे.
या न्यायालयाचे भव्य लोकार्पण रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे होणार आहे. हा सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती संदीप मारणे आणि मा. न्यायमूर्ती आसिफ डॉक्टर यांच्या हस्ते पार पडणार असून, पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एम. के. महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या, औद्योगिक आणि नागरी विस्तार लक्षात घेता स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची गरज दीर्घकाळापासून जाणवत होती. या न्यायालयामुळे पुणे न्यायालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिक, वकील आणि न्यायालयीन यंत्रणेसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.
नव्या न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा, न्यायप्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेची बचत होणार असून, पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायिक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. हा लोकार्पण सोहळा शहराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button