*महिला सक्षमीकरणाचा जागर; हळदी-कुंकू कार्यक्रमात आधुनिकतेची जोड*
*महिला सक्षमीकरणाचा जागर; हळदी-कुंकू कार्यक्रमात आधुनिकतेची जोड*

तळणी :(प्रतिनिधी महेंद्र बेराड )
येथील सदगुरु मल्टी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, तळणी यांच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू व महिला मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या विद्यार्थिनी रोहिणी काकडे यांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले, तर प्रस्तावना निकिता ठोंबरे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत केली.
या वेळी मुक्ता गोमलाडू यांनी PPT च्या माध्यमातून महिला सबलीकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आर्थिक स्वावलंबन, शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रोहिणी काकडे यांनी आपल्या सादरीकरणातून संस्थेचा वर्षभराचा कार्यआढावा मांडत संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व कौशल्यविकासाशी संबंधित उपक्रमांसह संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली.
कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोमल चंदन यांचे भाषण. त्यांनी आपल्या भाषणातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाची सोप्या भाषेत माहिती देत, महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण करू शकतात, यावर प्रकाश टाकला.
यानंतर उपस्थित महिलांसाठी मनोरंजक व ज्ञानवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. याच प्रसंगी संस्थेतील काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात संस्थेच्या गौरवपर भाषणात शन्नो खान यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना नवी दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच उपस्थित शिंदे ताई व भुतेकर ताई यांनी या कार्यक्रमाबाबत व संस्थेच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत समाधान प्रकट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संचालक श्री. विशाल सोनवणे यांनी सर्व मान्यवर, मार्गदर्शक, विद्यार्थिनी, व उपस्थित महिलांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. एकूणच हा कार्यक्रम महिलांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता आणि आधुनिकतेची जाणीव निर्माण करणारा ठरला.

