मीरा-भाईंदरमध्ये महिलांचे वर्चस्व कायम: सलग पाचव्यांदा महापौर पद महिलांसाठी राखीव*
*मीरा-भाईंदरमध्ये महिलांचे वर्चस्व कायम: सलग पाचव्यांदा महापौर पद महिलांसाठी राखीव*
मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत (एमबीएमसी) ‘महिलाराज’ कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर पद सलग पाचव्यांदा महिलांसाठी (सर्वसाधारण प्रवर्ग) राखीव ठेवण्यात आले असून, त्यामुळे शहराच्या राजकारणात महिलांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे.
आरक्षण सोडतीत स्पष्ट निर्णय
गुरुवारी (२२ जानेवारी) मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे महापौर पद महिलांच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. २००२ पासून आतापर्यंत महानगरपालिकेला आठ महापौर लाभले असून, त्यापैकी सहा महिला महापौर राहिल्या आहेत. विशेष म्हणजे २०१२ पासून सलग चार टर्ममध्ये महिलांनीच या सर्वोच्च पदाची धुरा सांभाळली आहे.
*महिला महापौरांची परंपरा*
माजी महापौर कॅटलिन परेरा, गीता जैन, डिंपल मेहता आणि ज्योत्स्ना हस्नाळे यांनी यापूर्वी महापौरपद भूषवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतही महिलांचे वर्चस्व स्पष्ट दिसून आले. एकूण ९५ नगरसेवकांपैकी तब्बल ५१ महिला नगरसेविका निवडून आल्याने पालिकेतील महिलांची ताकद अधिक मजबूत झाली आहे.
*भाजपच्या पुरुष उमेदवारांच्या आशा मावळल्या*
महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर महापौर पदासाठी आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर हे पद सर्वसाधारण (अनारक्षित) राहिले असते, तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक ॲड. रवी व्यास, हसमुख गेहलोत आणि ध्रुवकिशोर पाटील हे आघाडीचे दावेदार मानले जात होते. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, आरक्षणाच्या घोषणेमुळे त्यांच्या अपेक्षांना पूर्णविराम मिळाला आहे.
*महिला नेतृत्वाकडे लक्ष*
आता भाजपच्या महिला नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. शानू गोहिल, वंदना पाटील, डिंपल मेहता, दीपिका अरोरा, अनिता पाटील आणि वंदना भावसर या ज्येष्ठ महिला नगरसेविका महापौर पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तसेच, पक्ष नेतृत्वाकडून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देत ‘सरप्राईज’ उमेदवार पुढे आणला जाऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकूणच, मिरा-भाईंदर महानगरपालिकेत महिलांचे नेतृत्व आणि प्रभाव आगामी काळातही कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब

