मीरा-भाईंदरमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य;
मीरा-भाईंदरमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य;
नागरिक त्रस्त, अपघातांत वाढ — प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे.
अपघातांची मालिका; जीवितहानीचीही नोंद
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तसेच, मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसरात ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
खोदकामानंतर रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष
जलवाहिनी, विद्युतवाहिनी व केबल टाकण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात येते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करून डांबरीकरण करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
मीरा रोड–भाईंदर द्विस्तरीय पुलावर अवघ्या वर्षभरातच खड्डे पडल्याने दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्यास संबंधित महापालिकांनी भरपाई द्यावी, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लवकरच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली असली तरी ही कामे तातडीने व दर्जेदार व्हावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब

