भोकरदन तालुक्यातील रस्त्यांची अर्धवट कामे व भ्रष्टाचाराची चौकशी करा; अन्यथा आमरण उपोषण – बोरसे गुरुजी भोकरदन.
भोकरदन तालुक्यातील रस्त्यांची अर्धवट कामे व भ्रष्टाचाराची चौकशी करा; अन्यथा आमरण उपोषण – बोरसे गुरुजी

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे अर्धवट सोडून त्यांची बिले मात्र पूर्ण उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जालना जिल्हा सचिव बोरसे गुरुजी यांनी केली आहे. रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करून जनतेला सुविधा न दिल्यास आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संदर्भात मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांना स्वतंत्र पत्र देण्यात आले असून, त्याच्या प्रती मा. जिल्हाधिकारी, जालना, मा. उपविभागीय अधिकारी, भोकरदन यांच्यामार्फत मा. तहसीलदार, तहसील कार्यालय भोकरदन यांना सादर करण्यात आल्या असल्याचे बोरसे गुरुजी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
पत्रकानुसार सुरंगली फाटा ते जळगाव सपकाळ, पिंपळगाव रेणुकाई ते कोकडी, तसेच वरुड बु. ते माळेगाव (ता. भोकरदन) या रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. संबंधित रस्त्यांची कामे अर्धवट ठेवूनही ठेकेदारांकडून पूर्ण बिले उचलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकारी व ठेकेदार पूर्णपणे जबाबदार असून काम न करता शासकीय निधी हडप केल्याचा प्रकार असल्याचे पत्रकात नमूद आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन, आमरण उपोषण आदी मार्गांनी संघर्ष केला जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी महेजाद खान, इब्राहिम कुरेशी, फारुख शेख, नारायण सोनी यांच्यासह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी महेंद्र बेराड

