विश्वंभर सोनवणे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर

विश्वंभर सोनवणे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर
तळणी (ता. सिल्लोड): तळणी सारख्या ग्रामीण भागातील अगदी सामान्य, भूमिहीन आणि मर्यादित साधनांमध्ये जगणाऱ्या कुटुंबात जन्मलेले श्री. विश्वंभर दत्तू सोनवणे विशाल) यांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण, डिजिटल कौशल्य, समाजकार्य आणि पत्रकारिता या क्षेत्रात आज उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत कठीण असल्यामुळे शाळेत शिकत असताना त्यांनी मोलमजुरी करून शिक्षणाची गाठ कायम ठेवली. आई–वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि वारकरी संप्रदायातील मूल्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाला दिशा दिली.
“ग्रामीण भागातील मुलांनाही संगणक आणि तंत्रज्ञानाची समान संधी मिळायला हवी” या ध्येयातून त्यांनी सद्गुरू कॉम्प्युटर तळणी/जळगाव, विशाल मल्टी सर्विसेस ची स्थापना केली आणि MS-CIT, Tally, Digital Marketing, AI यांसारखे शासन मान्यता प्राप्त रोजगाराभिमुख कोर्सेस सुरू केले. विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांत त्यांनी आपल्या प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विविध कंपन्या व संस्थांमध्ये नोकरी मिळवून दिली, ही त्यांची समाजप्रतिबद्धता अधोरेखित करणारी बाब आहे.
पत्रकारितेत ते उत्कृष्ट मुलाखतकार म्हणून ओळखले जातात. शेतकरी प्रश्न, शिक्षण, समाजकार्य आणि उद्योजकता या विषयांवर सातत्याने लोकाभिमुख बातम्या देत ते जनजागृती करत आहेत. वारकरी संप्रदायातील सक्रिय सहभागामुळे त्यांचा स्वभाव, विचार आणि कार्यशैली अधिक समृद्ध झाली आहे.
सध्या ते विवेचन बहुउदेशिया सेवाभावी संस्थाच्या आधारावर YCMOU, MSSDS आणि NSDC अंतर्गत मोठे कौशल्य प्रशिक्षण केंद्र तळणीत सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत, ज्यातून किमान १००+ विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देता येईल. ग्रामीण युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध व्हावीत, डिजिटल साक्षरतेची वाढ व्हावी आणि ग्रामीण भागातूनच रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. शिलाई–ब्युटी–संगणक असे एकात्मिक मल्टी-स्किल केंद्र उभारण्याचे कामही ते करत आहेत.
त्यांच्या या संघर्षपूर्ण, मूल्याधारित आणि प्रेरणादायी प्रवासाची दखल घेत. संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे त्यांना १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत पत्र (क्र.संजीवनी/२०२५/७९५) द्वारे ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या आधी त्यांना सावित्री ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार, गुणीजन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, MKCL दर्जेदार प्रशिक्षण केंद्र पुरस्कार आणि पहाट फाउंडेशनचा संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक सन्मान मिळालेले आहेत. या सर्व पुरस्कारांनी त्यांचा संघर्ष आणि समाजसेवा यांना अधिक बळ दिले आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी नाशिक (सिन्नर) येथील अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर येथे म.राम शिंदे साहेब,केंद्रीय राज्यमंत्री मा.खा.मुरलीधर मोहाळ(अण्ण) राज्य मंत्री माणिकरावजी कोकाटे,शेतकरी नेते रविकांत तुपकरी,पद्मश्री राहीबाई पोपरे,विशेष कार्यकारी अधिकारी नाशिक श्री ओमकार पवार साहेब या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोनवणे यांना प्रदान करणायत येणार आहे , “हा पुरस्कार माझ्या कामाला केवळ सन्मान नाही, तर एक नवी जबाबदारी आहे. मोलमजुरीपासून सुरू झालेल्या या प्रवासात आई–वडिलांचे मार्गदर्शन, वारकरी संप्रदायातील शिकवण, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि माझ्या सहकार्याचा आधार हाच माझा खरा पाया आहे.” असे विश्वंभर सोनावणे यांनी सांगितले
प्रतिनिधी महेंद्र बेराड

