स्मार्ट सिटीचे फुटपाथ फेरीवाल्यांचे हॉटस्पॉट;

स्मार्ट सिटीचे फुटपाथ फेरीवाल्यांचे हॉटस्पॉट;
पुणे ,भोसरी: स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बांधलेले आधुनिक फुटपाथ नागरिकांच्या सुरक्षित चालण्यासाठी असले तरी प्रत्यक्षात फेरीवाल्यांच्या स्टॉल्समुळे ते पूर्ण व्यापले गेले आहेत. चाट-भेळ, फळ-भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढल्याने पादचारी रस्त्यावर उतरत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे.भोसरीतील प्रमुख रस्त्यांवर फुटपाथवर तात्पुरती दुकाने उभी राहिल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरत नाही. रहिवासी म्हणतात, “फुटपाथ चालण्यासाठी की फेरीवाल्यांसाठी? दिवसभर गर्दी असते, मुलांना किंवा ज्येष्ठांना घेऊन जाणे अवघड झाले आहे.” दुचाकी वाहने पार्क होऊन रस्ते अरुंद झाले आहेत.नगरपालिकेकडून अधूनमधून अतिक्रमणविरोधी मोहिम होतात, पण विक्रेते दुसऱ्याच दिवशी परत येतात. प्रशासनाने सांगितले, “अधिकृत हॉकर झोन (उड्डाण पुलाखाली) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, अनधिकृत व्यापारावर कारवाई वाढवणार आहोत.” तरीही परिस्थितीत बदल नाही.रहिवाशांनी मागणी केली आहे—फुटपाथ पूर्ण मुक्त करा, हॉकर झोन निश्चित करा आणि सातत्यपूर्ण देखरेख करा. स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ




