Maharashtra

सौ.शालिनीताई संजय सुखदान ‘आप’च्या महाराष्ट्रातील पहिल्या नगरसेविका दिल्लीचे आमदार प्रकाश जरवाल यांच्या हस्ते सत्कार.


नेवासा (प्रतिनिधी):
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शालिनीताई संजय सुखदान यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात आपले पहिले खाते उघडले आहे. या ऐतिहासिक यशाची दखल थेट दिल्लीतून घेण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी शुभेच्छा संदेश पाठवून नवनिर्वाचित नगरसेविकेचे अभिनंदन केले आहे.
अरविंद केजरीवाल यांचा शुभेच्छा संदेश घेऊन दिल्लीचे आमदार प्रकाश जरवाल यांनी नेवासा येथे अॅड. संजय सुखदान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार जरवाल यांच्या हस्ते सौ. शालिनीताई सुखदान व अॅड. संजय सुखदान यांचा विशेष गौरव सत्कार करण्यात आला. विक्रमी मतांनी मिळवलेल्या विजयाबद्दल तसेच महाराष्ट्रात पक्षाचे पहिले पाऊल उमटवल्याबद्दल सुखदान दाम्पत्याचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सुखदान परिवाराच्या वतीने आमदार जरवाल यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश जरवाल यांनी आम आदमी पार्टीच्या आगामी राजकीय धोरणाची माहिती दिली. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढवणार असून प्रचारासाठी देशभरातील स्टार प्रचारक राज्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी अॅड. संजय सुखदान यांनी कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, “नगरपंचायतीच्या माध्यमातून आम आदमी पार्टी शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या हितासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करेल.”
या सत्कार सोहळ्यास आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजितदादा फाटके, जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आघाव, तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, शहराध्यक्ष संदीप आलवणे यांच्यासह सलीमभाई सय्यद, करीम सय्यद, प्रविण तिरोडकर, विठ्ठल मैंदाड, कुणाल मांडण, बाळासाहेब साळवे, अण्णा लोंढे, किरण भालेराव तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी : श्याम शिरसाठ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button