राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल
राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आदी प्रमुख महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका आता मार्गी लागल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नव्याने लोकप्रतिनिधी मिळणार आहेत.
या निवडणुकांमध्ये 29 महापालिकांमधील एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार असून सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन अर्ज दाखल: 23 ते 30 डिसेंबर 2025
अर्जांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 2 जानेवारी 2026
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026
मतदान: 15 जानेवारी 2026
मतमोजणी व निकाल: 16 जानेवारी 2026
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून येत्या काळात प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
- प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

