केशवनगर–चिंचवडमध्ये बेकायदेशीर कचरा डम्पिंग; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
केशवनगर–चिंचवडमध्ये बेकायदेशीर कचरा डम्पिंग; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

केशवनगर–चिंचवड येथील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या एक वर्षापासून अनाधिकृतपणे घनकचरा, घाण, आरोग्यास हानिकारक माती तसेच राडा-रोडा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे दुर्गंधी पसरली असून अनेक रहिवासी आजारी पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या गैरप्रकाराबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संभाव्य आर्थिक संगनमतामुळेच हा प्रकार सुरू असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वस्ती असतानाही हे ठिकाण अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित झाले आहे.
आज महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी जाऊन राडा-रोडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना जाब विचारला. मात्र प्रशासनाकडून कोणतीही तातडीची कारवाई न झाल्यास नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास, सर्व रहिवाशांच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र व अनोखे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणाची महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन बेकायदेशीर कचरा त्वरित हटवावा, दोषींवर दंडात्मक कारवाई करावी तसेच भविष्यात अशा आरोग्यास अपायकारक कामांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


