जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कला विश्वावर शोककळा

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कला विश्वावर शोककळा
नोएडा, दि. १८ डिसेंबर २०२५ :
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ शिल्पकार राम वनजी सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. १७ डिसेंबरच्या मध्यरात्री नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१९२५ साली महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे जन्मलेल्या राम सुतार यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून शिल्पकलेचे शिक्षण घेतले. १९५९ साली दिल्ली येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी भारतासह जगभरात २०० हून अधिक भव्य शिल्पकृती साकारल्या.
त्यांच्या प्रमुख कलाकृतींमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, भारत व विदेशात उभारलेल्या गांधीजींच्या ३५० हून अधिक मूर्ती, छत्रपती संभाजी महाराजांचे १०० फूट शिल्प (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी) तसेच भगवान शिव (बेंगळुरू) यांचा समावेश आहे.
राम सुतार यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६) आणि महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
आज १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नोएडा सेक्टर-१९ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, सेक्टर-९४ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकला क्षेत्रात अपूरणीय क्षती झाली असून, कला विश्वातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे