Maharashtra

भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील म्युझिकल कारंजे धूळखात

भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील म्युझिकल कारंजे धूळखात

लाखो रुपयांचा प्रकल्प केवळ कागतोपत्रीच सुरू?

भोसरी–आळंदी रोड येथील सखुबाई गवळी उद्यानात नागरिकांच्या मनोरंजनासाठी तब्बल पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून म्युझिकल कारंज्याची उभारणी करण्यात आली होती. उद्घाटनावेळी मोठ्या थाटामाटात शोबाजी करण्यात आली, एक-दोन वेळा केवळ ट्रायल दाखवण्यात आली; मात्र त्यानंतर आजतागायत हे कारंजे कधीच नियमित सुरू झाले नाही.

आज या कारंज्याची अवस्था अत्यंत दयनीय असून संपूर्ण यंत्रणा धूळखात पडलेली दिसून येत आहे. लाईट्स, फाउंटन सिस्टीम आणि संगीत यंत्रणा वापराअभावी निकामी होण्याच्या मार्गावर आहेत. नागरिकांच्या कररुपी पैशातून उभारण्यात आलेला हा प्रकल्प शोभेची वस्तू ठरला असून लाखो रुपयांवर पाणी फिरल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

उद्यानात येणारे नागरिक आणि लहान मुले म्युझिकल कारंज्याची वाट पाहत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. देखभाल, दुरुस्ती किंवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागरिकांची मागणी आहे की, एकतर तात्काळ कारंजे कार्यान्वित करावे किंवा या प्रकल्पावर झालेल्या खर्चाची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. अन्यथा नागरिकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारे होणारी उधळपट्टी भविष्यातही सुरूच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी -विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button