न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती भवनात शपथविधी
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज (२४ नोव्हेंबर २०२५) भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला.
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड गावात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांचा कार्यकाळ अंदाजे १५ महिने असून, ते ०९ फेब्रुवारी २०२७ रोजी ६५ वर्षे पूर्ण करून निवृत्त होतील.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असताना अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. घटनात्मक, प्रशासकीय आणि मानवी हक्क विषयांवरील १,००० हून अधिक निर्णय देत त्यांनी न्यायक्षेत्रात कार्यकुशल नेतृत्व म्हणून आपली छाप उमटवली आहे.
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांच्या न्यायिक कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही कार्यरत होते.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात अनुभवी, न्यायप्रिय आणि दृढनिश्चयी नेतृत्व मिळाल्याची भावना न्यायक्षेत्रात व्यक्त होत आहे.


