न्यायालयाचा दणका: पालकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला तीन महिने सश्रम कारावास
न्यायालयाचा दणका: पालकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला तीन महिने सश्रम कारावास
नारायणगाव (ता. जुन्नर): ज्येष्ठ नागरिकांचे पालन-पोषण न करणाऱ्या मुलाला न्यायालयाने दणका दिला आहे. नागरिकांचे पालन पोषण व कल्याण कायदा, 2007 च्या कलम 24 नुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात जुन्नर न्यायालयाने आरोपीला तीन महिने सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात न्यायालयाने लक्ष्मण विठ्ठल गाडगे (वय 49, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) यांना दोषी ठरविले. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी याबाबत माहिती दिली.विठ्ठल बाबुराव गाडगे (वय 80) यांनी आपल्या दोन मुलांविरोधात – लक्ष्मण व सुनील (दोघेही रा. निमगाव सावा) – तक्रार दिली होती की, दोघेही मुलगे त्यांच्या मालमत्तेचा उपभोग घेत असतानाही त्यांचा व त्यांच्या पत्नीचा सांभाळ करत नाहीत. ही तक्रार 13 मे 2023 रोजी नारायणगाव पोलिसांकडे करण्यात आली होती.या तक्रारीवरून पोलिस हवालदार एस. एम. कोकणे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर जुन्नरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी दोषारोपपत्राचे परीक्षण करून आरोपी लक्ष्मण गाडगे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.ही कारवाई वृद्ध पालकांच्या हक्काच्या दृष्टीने आणि संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक संदेश देणारी ठरली आहे.
प्रतिनिधी संजय कोळी
7875903777

