कर्तव्यपूर्तीची ३८ वर्षे… महाराष्ट्र पोलिस सेवेतून सौ. शोभा प्रदीप पानसे यांचा गौरवशाली सन्मानाने सेवानिवृत्ती समारंभ


कर्तव्यपूर्तीची ३८ वर्षे… महाराष्ट्र पोलिस सेवेतून सौ. शोभा प्रदीप पानसे यांचा गौरवशाली सन्मानाने सेवानिवृत्ती समारंभ
पुणे : निष्ठा, शिस्त आणि समर्पणाची मूल्यपरंपरा जपत तब्बल ३८ वर्षे महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या सौ. शोभा प्रदीप पानसे (सहाय्यक पोलीस फौजदार) यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात, भावनिक आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला. त्यांच्या दीर्घ, प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान सेवेचा गौरव करत सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुळच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावातील शोभा पानसे यांनी साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून मोठ्या जिद्दीने वाटचाल केली. लग्न झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या मुलाला सांभाळत पोलिस सेवेत प्रवेश करत त्यांनी संघर्षातून उभं राहत धाडसी अधिकारी म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
गुन्हे तपास, समाजविघातक प्रवृत्तींचा मुकाबला, समाजजागृती मोहिमा अशा विविध क्षेत्रांत तीन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यभरातून १५० हून अधिक पुरस्कार आणि रेकॉर्डब्रेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.
या समारंभात सहकाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांचा मनापासून गौरव केला. त्यांच्या शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि माणुसकी जपणाऱ्या कार्यपद्धतीचे सर्वांनी एकमुखाने कौतुक केले.
विशेष म्हणजे या प्रसंगी त्यांचे शालेय शिक्षक अमित शेख सर आणि शालेय मित्र-मैत्रिणी देखील आवर्जून उपस्थित होते. बालपणीच्या गुरूंचा आणि मित्रांचा, सहकारी ,नातेवाईक आणि वरिष्ठांचा आशीर्वाद मिळाल्याने पानसे या क्षणी भावूक झाल्या.
समारोपात स्वतःच्या भावना व्यक्त करत पानसे म्हणाल्या,
“ही कर्तव्यपूर्तीची आणि राष्ट्रसेवेची गौरवशाली यात्रा होती. पोलिस दलाने दिलेली शिस्त आणि जनतेचे प्रेम मला नेहमीच प्रेरणा देत राहिले.”
राष्ट्ररक्षण, समाजरक्षण आणि संस्कृती संरक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या अविरत सेवेला समाजातील सर्व स्तरांतून गौरवाचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429
—



