“आरोग्य व्यवस्थेचा काळा चेहरा — रुग्णवाहिका चालकाचा निर्घृण कृत्य”

“आरोग्य व्यवस्थेचा काळा चेहरा — रुग्णवाहिका चालकाचा निर्घृण कृत्य”
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अमला गावात आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयातून घरी परतणाऱ्या सविता बारात (बांबरे) या महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला रुग्णवाहिकेच्या चालकाने गावापासून जवळपास दोन किलोमीटर आधीच रस्त्यावर उतरवून वाहन घेऊन निघून गेल्याची घटना घडली आहे.
जवळच्या कुटीर रुग्णालयातून प्रसूतीनंतर सवितेला वैद्यकीय सल्ल्याने रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिकेच्या चालकाने जबाबदारी झटकत सविता, तिचं नवजात बाळाला निर्जन रस्त्यावरच उतरवलं. प्रसूतीनंतर अशा कठीण अवस्थेत सवितेला बाळाला हातात घेऊन दोन किलोमीटर अंतर संघर्ष करत पायी चालत जावे लागले.
या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, “जी सेवा जीव वाचवण्यासाठी असते, तीच सेवाच आम्हाला संकटात ढकलत असेल तर सामान्य लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल उपस्थित केला आहे.
प्रशासन आणि आरोग्य विभागावर या प्रकरणातून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. संबंधित चालकाविरुद्ध चौकशीला सुरुवात झाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मोखाडा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, रुग्णवाहिकेचे नियमन आणि जबाबदारीतील बेफिकिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या अभावामुळे सामान्य नागरिकांना प्राणघातक परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याची वस्तुस्थिती या घटनेने अधोरेखित केली आहे.
🖊️ Reporter — उमेश कुलकर्णी, पुणे