वैयक्तिक मोबाईलवरून फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई
वैयक्तिक मोबाईलवरून फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
वाहतूक कोंडी, अपघात किंवा रस्त्यावर घडणाऱ्या इतर घटनांचे फोटो आपल्या वैयक्तिक मोबाईल फोनवरून काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई करण्यात आली आहे. विभागीय नियंत्रण कक्षाकडून याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, घटनास्थळी केवळ अधिकृत सरकारी मोबाईल किंवा उपकरणातूनच छायाचित्रे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक वेळा वैयक्तिक मोबाईलवर घेतलेले फोटो सोशल मीडियावर शेअर होण्याची किंवा चुकीच्या पद्धतीने प्रसारित होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे माहिती लीक होऊ नये व पुराव्यांचे गोपनीयतेचे रक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी सेवा काळात केवळ विभागाकडून दिलेले अधिकृत टॅबलेट, कॅमेरा किंवा इतर यंत्रणांचा वापर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमभंग केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ