शहरात लिफ्ट दुर्घटनांचा वाढता धोका; गृहप्रकल्पातील लिफ्टचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी
🏢 शहरात लिफ्ट दुर्घटनांचा वाढता धोका; गृहप्रकल्पातील लिफ्टचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी
रामस्मृती सोसायटी, चऱ्होली-चोवीसावडी येथे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
भोसरी प्रतिनिधी :
शहरात लिफ्ट दुर्घटनांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच चऱ्होली-चोवीसावडी येथील रामस्मृती सोसायटीत घडलेली दुर्घटना याचे ताजे उदाहरण आहे.
दिनांक २ ऑक्टोबर रोजी १२ वर्षांच्या मुलाचा लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर शहरातील गृहप्रकल्पांमधील लिफ्टची सुरक्षा कितपत सक्षम आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सोसायटींमध्ये लिफ्ट बसविल्या असल्या, तरी त्यांची नियमित तपासणी आणि देखभाल (AMC) होत नाही. अनेक ठिकाणी तांत्रिक दोष, जुनी वायरिंग, आणि अवैध लिफ्ट ऑपरेशनमुळे धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून शहरातील सर्व गृहप्रकल्पांतील लिफ्टचे सुरक्षा ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
महापालिकेने आणि विद्युत निरीक्षक विभागाने याबाबत संयुक्त मोहीम राबवून प्रत्येक लिफ्टची तपासणी, परवाना पडताळणी आणि तांत्रिक प्रमाणपत्र तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लिफ्ट दुर्घटनांमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलून दोषी प्रकल्पांवर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ
